पुणे बंगळूर महामार्गावरील कैलास भेळ माहिती नाही असा माणूस विरळाच. कैलासची भेळ, मिसळ, पिठलं भाकरीची चव खवैय्याना नेहमीच खुणावते.
अशा ‘कैलास’ कुटुंबियांची म्हणजे मिठारे परिवाराची आज सदिच्छा भेट झाली. यावेळी मिठारे परिवाराने ज्या मिठ्ठासपणे आदरातिथ्य केलं, त्याने ही भेट चविष्ट तर झालीच शिवाय कायम मनात रेंगाळत राहील अशीही झाली.
१९७५ साली श्रीमती हिराबाई मिठारे यांनी पती किसनराव यांच्या सहकार्याने कैलास भेळ सुरू केले. हिराबाई जणू अन्नपूर्णा. त्यामुळे त्यांच्या हातातून साकारलेल्या चविष्ट पदार्थांनी संपूर्ण महामार्ग काबीज केला. भेळ, चहा आणि इतर पदार्थां सोबत त्यांनी पिठलं भाकरीचे जेवण सुरू केले. त्याची चव चाखायला दुरदूरहून खवैये यायला लागले. तो ओघ आजही वाढतच आहे.
त्या प्रतिसादामुळे मिठारे यांच्या तीन पिढ्यांनी छोट्या पत्र्याच्या छताखाली ४८ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा व्यवसाय आता मॉल सदृष्य मोठ्या प्लॅटफॉर्मसह दोन शाखात वाढला आहे. एवढेच नव्हे तर कैलासची उत्पादने आता परदेशातही विकली जातात. त्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबातील धडपड्या, जिद्दी, कष्टाळू महिला पुरुषांनी हॉटेलसह आता विविध क्षेत्रात घेतलेली उद्योग भरारी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मिठारे कुटुंबाच्या या प्रगतीचा मूळ स्त्रोत या आज भेटलेल्या कैलास उद्योगाच्या संस्थापक श्रीमती हिराबाई मिठारे आहेत याचा आनंद खूपच. त्याच आनंदातून या भेटीविषयी भरभरून सांगणं झालं.
आज अत्यंत प्रेमपूर्वक जिव्हाळ्याने श्रीमती हिराबाई मिठारे यांच्यासह सुभाष मिठारे, अशोक मिठारे, वैभव मिठारे आणि त्यांच्या साऱ्या कर्तबगार सूना नातवंडांनी माझं स्वागत, सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
Share via: