दार उघड बये दार उघड..!
डफड्याच्या भेदक आवाजाच्या तालावर, स्वतःभोवती गिरकी घेत सटदिशी पाठीवर आसूड ओढून घेणारे पोतराज पूर्वी गावोगावी पाहायला मिळायचे. डफड्याचा आवाज आला, आसूड कडाडला, की लोक म्हणायचे गावात कडकलक्ष्मी आली.
‘मरीआई आली, दार उघड बये दार उघड’, असा पुकार व्हायचा. हळदी कुंकू वाहून, नमस्कार करून माता, भगिनी सुपातून धान्य द्यायच्या. मात्र एकूणच पोतराजाचा वेष, स्वतःच्या पाठीवर स्वतः आसूड ओढून घेणं, यामुळे लहान मुलं मात्र भीतीने दडून बसायची. पूर्वी पटकी आजाराची साथ आली, की पोतराजाला बोलावून मरीआईचा गाडा ओढला जायचा. गाव बांधण्याचा विधी व्हायचा.
असे गाव बांधणाऱ्या पोतराजांची पुढची पिढी जिद्दीने शिक्षण घेऊन यशस्वी होत आहे. त्यातून पोतराजांचे फिरतीचे, हलाखीचे जिणे हटत चालले आहे. ही सकारात्मक बाब आहे. हे सारे आठवण्याचे, सांगण्याचे कारण म्हणजे काल दौंड मध्ये मला भेटलेले गोरख भगवान पवार आणि ईराबाई गोरख पवार हे पोतराज दाम्पत्य.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उत्तमआप्पा आटोळे यांना भेटून या दांपत्याने, वहिनींना भेटवा की आम्हाला, अशी विनंती केली. त्यावर आप्पांनी क्षणात त्यांची आणि माझी भेट घडवली, ओळख करून दिली.
या दाम्पत्याचे माझ्याकडे काही काम नव्हते किंवा काही सांगणेही नव्हते. फक्त मला भेटण्याची उत्सुकता होती. त्या उत्सुकतेतून ते मला भेटले. मला शुभेच्छा दिल्या. आई पाठीशी आहे, असे सांगत आशीर्वाद दिले.
अशा प्रकारे सर्व स्तरातून मिळणारे आशीर्वाद, सदिच्छा मोलाच्या आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा तळागाळात कसा संपर्क आहे, हेही आटोळे यांनी घडवलेल्या या भेटीतून दिसून आले. त्याचे समाधान विशेष.
Share via: